सरकारचा गॅस ग्राहकांना धक्का: दुहेरी कनेक्शनवर कारवाई १ जुलैपासून पीएनजी असणाऱ्यांना एलपीजी बंद!

    06-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून, १ जुलैपासून काही घरांमध्ये एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबवण्यात येणार आहे. विशेषतः पीएनजी (पाइपद्वारे नैसर्गिक वायू) सुविधा असलेल्या ग्राहकांना हा निर्णय लागू होणार आहे.

नव्या नियमानुसार, पीएनजी आणि एलपीजी अशी दोन्ही कनेक्शन ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील ७० हजारांहून अधिक ग्राहकांना आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार आहे.

पुरवठा विभागाने संबंधित गॅस कंपन्यांकडून अशा ग्राहकांची माहिती मागवली असून, दुहेरी कनेक्शन असणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशा ग्राहकांचा एलपीजी पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद केला जाणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद कुमार यांनी सांगितले की, “पुढील तीन महिन्यांत पीएनजी कनेक्शन असलेल्या घरांना एलपीजी सिलिंडर देणे पूर्णपणे थांबवले जाईल.” केंद्राच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे.


ज्या परिसरात पीएनजी पाइपलाइन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पीएनजी कनेक्शन घ्यावे लागणार आहे. घरापासून ३०० मीटरच्या परिसरात पाइपलाइन असल्यास एका आठवड्यात कनेक्शन देण्यात येईल. यासाठी ६ हजार रुपयांची सुरक्षा ठेव भरावी लागेल.

प्रशासनाने पुढील तीन महिन्यांत २५ हजार नवीन पीएनजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजार ग्राहकांना जोडले जाणार आहे.


सरकारकडून एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक सिलिंडरचा दर अधिकृतपणे कमी असताना, काही ठिकाणी तोच सिलिंडर १८०० ते २००० रुपयांना विकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असून, अनेक भागांत सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली असून, काही ठिकाणी दर २००० रुपयांपुढे गेले आहेत. घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आल्याने कंपन्यांना प्रति सिलिंडर तोटा सहन करावा लागत आहे.

साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकार व तेल कंपन्यांकडून संयुक्त कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे.