नागपुरात खळबळ उडवणाऱ्या अथर्व नानौरे हत्याकांडाचा उलगडा; शेजाऱ्यासह तिघांना अटक

    06-Apr-2026
Total Views |

नागपूर : शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय अथर्व नानौरे हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने संयुक्तपणे कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, सर्व आरोपींचे वय २० ते २२ वर्षांच्या दरम्यान आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा अथर्वचा शेजारीच असल्याचे तपासात समोर आले आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेदरम्यान अथर्व अचानक बेपत्ता झाला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाला वेग आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अथर्वच्या हालचालींचा मागोवा घेत तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

यानंतर अथर्वचा मृतदेह कळमेश्वर तालुक्यातील भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत एका गोणीत सापडला. त्याचे हात-पाय बांधलेले असल्यामुळे ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर शहरभर भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

तपासादरम्यान अथर्व शेवटचा दोन मित्रांसोबत आईस्क्रीम पार्लरजवळ दिसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आरोपींनी त्याला अशा ठिकाणी नेले, जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळी आढळलेल्या पोत्यावरील ट्रेडमार्क हा तपासातील महत्त्वाचा धागा ठरला. त्याच आधारावर पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. प्राथमिक चौकशीत वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासावर लक्ष केंद्रित केले होते. सध्या तिन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपासात हत्येमागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.