
Image Source:(Internet)
तेहरान : इराणची राजधानी तेहरान येथे झालेल्या भीषण हवाई हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. निवासी भागावर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात किमान १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे हे हल्ले केल्याचा आरोप केला जात असून, राजधानीच्या नैऋत्य भागातील एका शहरातील इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
माहितीनुसार, तेहरानमधील प्रतिष्ठित शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीलाही हल्ल्याचा फटका बसला आहे. विद्यापीठाच्या काही इमारतींसह जवळील गॅस वितरण केंद्राचेही मोठे नुकसान झाले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली अंतिम मुदत जवळ येत असताना, इराणवर दबाव वाढवण्यासाठी हल्ल्यांची तीव्रता वाढवण्यात आल्याचे मानले जात आहे. एका बाजूला चर्चेचा प्रस्ताव ठेवला जात असताना, दुसऱ्या बाजूला हवाई हल्ले सुरूच असल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे.
तज्ज्ञांच्या मते, शरीफ विद्यापीठाला लक्ष्य करण्यामागे रणनीतिक कारण असू शकते. येथे इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित संशोधन सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.