‘प्रहार’चे बच्चू कडू शिंदे गटात; धनुष्यबाणासह शिवसेनेत पुनरागमन

    30-Apr-2026
Total Views |

मुंबई : राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना चालना देणाऱ्या निर्णयात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात अधिकृत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्या उपस्थितीत कडू यांनी धनुष्यबाण हाती घेत समर्थकांसह पक्षप्रवेशाची घोषणा केली.
विशेष म्हणजे, बच्चू कडू यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती. पुढे त्यांनी स्वतंत्र भूमिका घेत ‘प्रहार’च्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता पुन्हा शिवसेनेत परतल्याने त्यांच्या ‘घरवापसी’ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना कडू यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय कोणत्याही पदाच्या अपेक्षेने घेतलेला नसून जनतेच्या प्रश्नांसाठी आहे. “शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी अधिक ताकदीने लढता यावे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. झेंडा बदलला तरी विचार आणि भूमिका कायम राहतील,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णयही कडू यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून ‘प्रहार’ची वाटचाल थांबणार असली, तरी सामाजिक संघटना म्हणून ‘प्रहार’ पुढेही कार्यरत राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या घडामोडीमुळे विशेषतः विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांवर त्याचे परिणाम दिसण्याची चिन्हे आहेत.