Image Source:(Internet)
नागपूर :
शहरातील महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरावर ‘रेडिओॲक्टिव्ह’ हल्ल्याची धमकी देणारे निनावी पत्र समोर आल्याने नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर पोलिस आणि विविध सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली करत परिसरात हाय अलर्ट जाहीर केला आहे.
पोलिस आयुक्तालयाला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झालेल्या या पत्रात स्वतःची ओळख ‘डीएसएस’ अशी देण्यात आली आहे. इंग्रजीत लिहिलेल्या या पत्रातील मजकूर आक्षेपार्ह असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी रवींद्रकुमार सिंगल यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
‘सिझीयम-137’चा उल्लेख; तपास यंत्रणांची धावपळ
या पत्रात ‘सिझीयम-137’ या रेडिओॲक्टिव्ह घटकाचा वापर करून संघ मुख्यालय, स्मृतिमंदिर तसेच शहरातील काही मेट्रो परिसरात तो पसरवल्याचा दावा करण्यात आला आहे. या गंभीर दाव्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, तातडीने तपास मोहीम राबवण्यात आली.
बॉम्ब शोध पथक, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि NDRFच्या पथकांनी संबंधित ठिकाणी सखोल तपासणी केली. प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद रेडिओॲक्टिव्ह पदार्थ आढळला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
‘सिझीयम-137’ म्हणजे काय?
‘सिझीयम-137’ हा अणुभट्ट्यांमध्ये निर्माण होणारा एक धोकादायक रेडिओॲक्टिव्ह घटक आहे. याचे अर्धायुष्य सुमारे ३० वर्षे असून, तो बीटा आणि गामा किरणोत्सर्ग उत्सर्जित करतो. त्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
आरोग्यावर संभाव्य परिणाम-
या रेडिओॲक्टिव्ह घटकाच्या संपर्कात आल्यास त्वचेचे नुकसान, रेडिएशनशी संबंधित आजार आणि दीर्घकालीन कर्करोगाचा धोका संभवतो. पाण्यात सहज मिसळणारा हा पदार्थ पर्यावरणात वेगाने पसरू शकतो, तसेच शरीरात गेल्यास स्नायूंमध्ये साठण्याची शक्यता असते.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था-
RSS मुख्यालयाची सुरक्षा CISFकडून सांभाळली जात असून, सुमारे १५० जवान २४ तास तैनात आहेत. नागपूर पोलिसांनी बाह्य सुरक्षा अधिक कडक केली असून, गरजेनुसार इतर केंद्रीय दलांची मदत घेतली जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.