हाडे कमकुवत, स्मरणशक्ती कमी? पन्नाशीनंतर D आणि B12 ची गरज वाढते!

    03-Apr-2026
Total Views |
 
Weak Bones poor
 Image Source:(Internet)
मुंबई :
वाढत्या वयासोबत शरीरात अनेक बदल घडू लागतात आणि त्याचा थेट परिणाम हाडांची (Bones) मजबुती, स्मरणशक्ती तसेच रोगप्रतिकारक शक्तीवर होताना दिसतो. विशेषतः पन्नाशीनंतर शरीराची पोषक तत्व शोषून घेण्याची क्षमता कमी होत असल्याने आहाराकडे अधिक सजगतेने पाहण्याची गरज निर्माण होते. अशा वेळी व्हिटामिन D आणि B12 यांचे महत्त्व अधिक वाढते.
 
व्हिटामिन D ला ‘सनशाईन व्हिटामिन’ म्हणून ओळखले जाते. त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर हे शरीरात तयार होते. मात्र वय वाढल्यानंतर ही प्रक्रिया मंदावते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कॅल्शियमचे योग्य शोषण होण्यासाठी व्हिटामिन D आवश्यक असते. याची कमतरता असल्यास हाडे कमजोर होऊन फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो.
 
यासोबतच कॅल्शियमचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. वयानुसार हाडांची घनता कमी होत जाते आणि विशेषतः महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ही प्रक्रिया अधिक वेगाने होते. दूध, दही, पनीर आणि हिरव्या पालेभाज्या यामधून कॅल्शियमची भरपाई करता येते.
 
व्हिटामिन B12 हे मेंदूच्या कार्यासाठी आणि रक्तातील लाल पेशींच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. वय वाढल्यानंतर शरीरात याचे शोषण कमी झाल्याने थकवा, अशक्तपणा आणि विस्मरणासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे B12 युक्त आहार घेणे गरजेचे ठरते.
 
तसेच व्हिटामिन C आणि E यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. व्हिटामिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराच्या दुरुस्तीत मदत करते, तर व्हिटामिन E पेशींना नुकसानापासून संरक्षण देते. संत्री, स्ट्रॉबेरी, किवी, ब्रोकोली यांसारख्या पदार्थांमधून व्हिटामिन C मिळते. पालक आणि इतर हिरव्या भाज्यांमधून व्हिटामिन E आणि K ची पूर्तता होते.
 
एकंदरीत, पन्नाशीनंतर निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी संतुलित आहारासोबत आवश्यक व्हिटामिन्सची पूर्तता करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.