‘रामायण’ टीझरची धूम; रावणाच्या ४ सेकंदांच्या झलकनेच सोशल मीडियावर खळबळ

    03-Apr-2026
Total Views |
 
Ramayana
 Image Source:(Internet)
मुंबई :
बहुप्रतिक्षित ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाचा टीझर हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भव्यदिव्य मांडणी आणि दमदार व्हिज्युअल्समुळे हा टीझर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
 
टीझरमध्ये प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणबीर कपूरच्या लूकचे विशेष कौतुक होत असून, त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत स्पष्टपणे जाणवते. मात्र, या टीझरमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे रावणाच्या भूमिकेतील यशची केवळ ४ सेकंदांची झलक.
 
२ मिनिट ३८ सेकंदांच्या या टीझरमध्ये शेवटच्या टप्प्यात यशची एंट्री होते. विशेष म्हणजे त्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नसून फक्त पाठमोरा लूक आणि त्यानंतर दिसणारे पुष्पक विमान यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या छोट्याशा सीनवर सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली असून, निर्मात्यांनी जाणूनबुजून सस्पेन्स ठेवला असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
 
 
 
‘केजीएफ’मुळे देशभरात लोकप्रिय झालेला यश या चित्रपटात केवळ रावणाची भूमिका साकारत नाही, तर सहनिर्मात्याची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, सुमारे ४००० कोटींच्या बजेटसह तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, सनी देओल आणि रवी दुबे यांसारख्या मोठ्या कलाकारांचा समावेश असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.