“घराणेशाही म्हणाल तरी चालेल…”; अमोल मिटकरींचा जय पवार यांच्या नावावर जोर

    28-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अमोल मिटकरी यांनी एका ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. अजित पवार गटातील या नेत्याने थेट जय पवार यांचे नाव पुढे करत, त्यांना उमेदवारी देण्याची उघड मागणी केली आहे.

मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये पक्षवाढीसाठी तरुण आणि विश्वासू नेतृत्व पुढे आणण्याची गरज असल्याचे सांगितले. “काहींना हे घराणेशाही वाटेल, पण भविष्यातील नेतृत्व म्हणून जय पवार योग्य पर्याय ठरू शकतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले. अजित पवारांनंतर पक्षासाठी सक्षम चेहरा म्हणून जय पवार पुढे येऊ शकतात, असा विश्वासही त्यांनी दर्शवला.

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 साठी महायुतीत जोरदार हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी अनेक इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

१२ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी एकूण १० जागा रिक्त असून, त्यापैकी एक जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. या एकाच जागेसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दिकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ कांबळे आणि उमेश पाटील यांचा समावेश असल्याचे समजते.

मिटकरींच्या ट्विटनंतर पक्षांतर्गत समीकरणांवर आणि पवार कुटुंबाच्या प्रभावावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. आता अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.