
Image Source:(Internet)
मुंबई : दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया (४०), पत्नी नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुली आयशा (१६) व ज़ैनब (१३) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता या कुटुंबाने पाच नातेवाईकांसह जेवण केले. जेवणानंतर नातेवाईक आपल्या घरी परतले. त्यानंतर डोकाडिया कुटुंबाने कलिंगड खाल्ले. मात्र, दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास चौघांनाही अचानक उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला.
प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी प्रथम फॅमिली डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र, स्थिती गंभीर होत गेल्याने त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सकाळी १०.१५ वाजता सर्वात आधी ज़ैनब हिचा मृत्यू झाला. त्यानंतर नसरीन आणि आयशाचा मृत्यू झाला, तर रात्री १०.३० वाजता अब्दुल्ला यांनीही अखेरचा श्वास घेतला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. हिस्टो-पॅथॉलॉजी अहवाल येईपर्यंत डॉक्टरांनी अंतिम निष्कर्ष राखून ठेवला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली.
दरम्यान, रात्रीच्या जेवणामुळे विषबाधा झाली की त्यानंतर खाल्लेल्या कलिंगडामुळे हा प्रकार घडला, याचा तपास पोलीस करत आहेत. खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.