
Image Source:(Internet)
नागपूर : केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ने अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटावर काही अटींसह मंजुरी दिली आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट विविध कारणांनी चर्चेत आला असून सेन्सॉर प्रक्रियेनंतर त्याला U/A 16+ प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
२४ एप्रिल रोजी चित्रपटाची सेन्सॉर तपासणी पूर्ण झाली. या वेळी मंडळाने निर्मात्यांना काही महत्त्वाचे बदल करण्याचे निर्देश दिले. चित्रपटाच्या सुरुवातीला दिलेला डिस्क्लेमर अधिक स्पष्ट आणि ठळक शब्दांत मांडण्यास सांगण्यात आले, तसेच आवश्यक ठिकाणी व्हॉईसओव्हर जोडण्याची सूचनाही करण्यात आली.
यासोबतच ‘राजा शिवाजी’ हे शीर्षक का निवडले, याचे स्पष्टीकरण मागवण्यात आले. चित्रपटात दाखवलेल्या ऐतिहासिक घटनांसंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, संवाद आणि गाण्यांशी सुसंगत स्क्रिप्टही सादर करण्यास सांगितले आहे. प्रमुख ऐतिहासिक घटनांना अचूक तारखा देणे आणि आवश्यक त्या ठिकाणी माहितीपर मजकूर फलक (text cards) समाविष्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले.
दरम्यान, मंडळाने चित्रपटातील दोन महत्त्वाच्या दृश्यांवर कात्री चालवली. एका लहान मुलाच्या गळा चिरण्याचा प्रसंग पूर्णपणे हटवण्यात आला असून त्याऐवजी अधिक योग्य दृश्य समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच काही मूक (silent) दृश्यांमध्ये आवश्यक ध्वनी प्रभाव जोडण्याचेही आदेश देण्यात आले.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका स्वतः रितेश देशमुख साकारत आहेत. त्यांच्या सोबत जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांचा समावेश आहे.‘राजा शिवाजी’ हा बहुचर्चित चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.