
रुद्रप्रयाग : केदारनाथ मंदिर चे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला वेग आला असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. अवघ्या तीन दिवसांत सुमारे १.१० लाखांहून अधिक भक्तांनी मंदिरात दर्शन घेतल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
केदार सभेचे अध्यक्ष राजकुमार तिवारी यांनी सांगितले की, मंदिरासोबतच भगवान भैरवनाथांचे दरवाजेही उघडण्यात आले असून, सध्या धामातील सर्व व्यवस्था सुरळीतपणे सुरू आहेत. प्रत्येक भाविकाला कोणतीही अडचण न येता दर्शन मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, काही समाजकंटकांकडून मंदिराबाबत होणाऱ्या चुकीच्या कृत्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
केदार सभेचे ज्येष्ठ सदस्य उमेश चंद्र पोस्ती यांनीही यात्रेची स्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, बीकेटीसी आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून यात्रेकरूंसाठी उत्तम सुविधा पुरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करून भाविकांनी निर्धास्तपणे केदारनाथला यावे, असे आवाहन त्यांनी केले.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिरात टोकन पद्धती लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. निवास, भोजन आणि सुरक्षेसाठी प्रशासन, केदार सभा आणि स्थानिक नागरिक संयुक्तपणे काम करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, केदार सभेचे सदस्य संजय तिवारी यांनी सर्व भाविकांचे स्वागत करत, केदारनाथ धाममध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांनीही सोशल मीडियावर सुरू असलेल्या चुकीच्या माहितीचे खंडन करत, यात्रेकरूंना निर्धास्तपणे दर्शनासाठी येण्याचे आवाहन केले.