आधारकार्डशिवाय प्रसूती नोंदींचा धक्कादायक प्रकार; सोलापुरात ८५ बालमातांची नोंद, चौकशीसाठी ७ पथके नियुक्त

    27-Apr-2026
Total Views |

सोलापूर : शहरात बालमातांच्या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. प्रसूतीदरम्यान महिलांचे वय आधारकार्डशिवाय केवळ अंदाजाने नोंदवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. २०२५ आणि २०२६ या कालावधीतील सर्व प्रसूती नोंदींची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली सात विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

तपासात शहरातील सिव्हिल हॉस्पिटल, काही खासगी रुग्णालये तसेच महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये किमान ३५ बालमातांची प्रसूती झाल्याचे समोर आले आहे. संबंधित प्रकरणांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे त्या काळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे ही माहिती उपलब्ध असतानाही ती पोलिसांपर्यंत पोहोचवली गेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आली असून, महात्मा फुले समाजसेवा मंडळाच्या प्रयत्नांमुळे हा प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या नोंदीनुसार, २०२५-२६ या कालावधीत एकूण ८५ बालमातांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी ३५ मुलींनी नागरी आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेतले, तर उर्वरित अल्पवयीन मुलींनी खासगी व सहकारी रुग्णालयांमध्ये प्रसूती केली आहे. यामध्ये वळसंग, मोहोळ, तसेच कोल्हापूर आणि पुणे परिसरातील मुलींचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता नियुक्त करण्यात आलेल्या सात पथकांच्या अहवालानंतर पुढील कारवाई होणार असून, या प्रकरणात आणखी किती धक्कादायक बाबी समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.