मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलावा; संजय निरुपमांची नवी मागणी

    27-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्याच्या परिवहन विभागाने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी येत्या १ मेपासून होणार आहे. मात्र या निर्णयावरून वाद निर्माण झाला असून, काही रिक्षा चालकांनी संपाची हाक दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पुन्हा पत्र पाठवत महत्त्वाची मागणी केली आहे. मराठी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी किमान ६ महिने ते १ वर्षांसाठी पुढे ढकलावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

निरुपम यांनी पत्रात नमूद केले आहे की, मराठी ही महाराष्ट्राची ओळख, अभिमान आणि संस्कृतीचा आत्मा असली तरी कोणतीही भाषा आत्मसात करण्यासाठी वेळ आवश्यक असतो. मुंबईत हजारो रिक्षा आणि टॅक्सी चालक हे परराज्यातून येऊन कष्टाने आपले जीवन उभारत आहेत. ते मराठी शिकण्यास तयार आहेत, मात्र त्यांना पुरेसा कालावधी देणे गरजेचे आहे.

सध्याच्या आदेशामुळे चालकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. या निर्णयाचा त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

त्यामुळे शासनाने सहानुभूतीने विचार करून निर्णयाला मुदतवाढ द्यावी, जेणेकरून चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल आणि शासनाचा उद्देशही सकारात्मक पद्धतीने साध्य होईल, अशी अपेक्षा निरुपम यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मराठी सक्तीच्या निर्णयावरून राज्यात राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगत असून, पुढील काही दिवसांत या मुद्द्यावर अधिक घडामोडी होण्याची शक्यता आहे.