
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, १२ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणनीती आखली जात आहे. उपलब्ध संख्याबळानुसार महायुतीला आठ, तर महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याचे चित्र स्पष्ट दिसत असले तरी, निवडणूक बिनविरोध व्हावी की चुरशीची होईल, यावर अजूनही अनिश्चितता आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून ही निवडणूक बिनविरोध पार पडावी, अशी भूमिका मांडली जात आहे. मात्र, Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ऐनवेळी वेगळा डाव टाकत दहावा उमेदवार उभा करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराच्या विजयासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजपने सहा जागांवर दावा सांगितला असून राम सातपुते, संदीप जोशी, केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही ‘सरप्राईज फॅक्टर’ दिसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेकडे विधानसभेत ५७ आमदार असल्याने दोन जागांवर त्यांचा दावा मजबूत मानला जात आहे. यासाठी नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, रवींद्र धंगेकर, डॉ. रोहित टिळक, राजू वाघमारे आणि शायना एनसी यांची नावे पुढे येत आहेत. याचबरोबर ऐनवेळी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा ‘धक्का तंत्र’ वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा जाणार असून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, समीर भुजबळ, सूरज चव्हाण, उमेश पाटील आणि अनिकेत तटकरे इच्छुक असल्याचे समजते.
महाविकास आघाडीत एकमत न झाल्यास या निवडणुकीचे समीकरण बदलू शकते. शिवसेना नववा उमेदवार उतरवत असल्यास काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवण्याबरोबरच राष्ट्रवादीमध्ये मतांची फूट पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून Uddhav Thackeray यांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह काँग्रेसकडून होत आहे. मात्र, त्यांनी नकार दिल्यास उमेदवारीसाठी अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे आणि वैभव नाईक यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत आणि राजेश राठोड यांची नावेही चर्चेत आहेत.
एकूणच, निवडणूक बिनविरोध होणार की शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणे बदलून रंगत वाढणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.