एलपीजी तुटवडा टाळण्यासाठी केंद्राचा निर्णय; तातडीच्या खरेदी प्रक्रियेला वेग

    25-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असताना, देशात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. तातडीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आता खुल्या बाजारातून थेट गॅस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आखाती देशांकडून होणाऱ्या पुरवठ्यात घट झाल्याने सरकारने पर्यायी मार्ग स्वीकारत विविध देशांकडून अतिरिक्त गॅस मागवण्यास सुरुवात केली आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून ही खरेदी केली जात असून, पुढील काही महिन्यांत हा साठा देशात पोहोचणार आहे.

देशात दररोज मोठ्या प्रमाणात गॅसची गरज भासते. स्थानिक उत्पादन वाढले असले तरी संपूर्ण गरज भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. याच पार्श्वभूमीवर सरकारने आयात करणाऱ्या देशांची संख्या वाढवून पुरवठा अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वी मुख्यत्वे आखाती देशांवर अवलंबून असलेला गॅस पुरवठा आता विविध देशांकडून मिळवला जात आहे. त्यामुळे पुरवठा साखळी अधिक सक्षम झाली असून भविष्यातील तुटवड्याचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.

पुरवठा अखंडित राहावा यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस आयात आधीच निश्चित करण्यात आली आहे. अलीकडेच देशात दाखल झालेल्या जहाजांमधून मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध झाला आहे.

दरम्यान, तातडीच्या गरजेनुसार बाजारातून त्वरित खरेदी करण्याची पद्धत अवलंबल्यामुळे नागरिकांना गॅसची कमतरता भासणार नाही, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.