
Image Source:(Internet)
अमरावती : माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशातील बागेश्वर धाम येथे दिलेल्या भेटीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या भेटीचे छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गवई यांच्या भूमिकेवर टीका केली. धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याचा आरोप करत, गवई यांनी आंबेडकरी विचारांचा उल्लेख करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
“आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारे वागणे धक्कादायक आहे. यामुळे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे,” अशा शब्दांत मानव यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, गवई यांच्या या भेटीमुळे सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याआधीही धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे ते चर्चेत आले होते. अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर माजी सरन्यायाधीशांच्या भेटीचे पडसाद अधिक तीव्र झाले असून, या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.