बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून राज्यात संताप; आमदार रोहित पवार यांचा कडक इशारा

    25-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या विधानावर पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराजांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करणारे असे वक्तव्य महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते. मात्र त्या वेळी कोणीही आक्षेप नोंदवला नाही, याबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली. इतक्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अशी विधाने होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

पुढे त्यांनी इशारा देत सांगितले की, अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान दिले जाणार नाही. यापूर्वीही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप करत त्यांनी सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.

या प्रकरणामुळे राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.