
Image Source:(Internet)
मुंबई : टीव्ही आणि वेब मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता करण वाही सध्या अभिनय सोडणार असल्याच्या चर्चांमुळे चर्चेत आला होता. मात्र या सर्व अटकळींना त्याने स्वतःच पूर्णविराम दिला आहे.
‘रीमिक्स’, ‘दिल मिल गये’, तसेच ‘नेव्हर किस युअर बेस्ट फ्रेंड’ (सीझन २) आणि ‘चन्ना मेरे या’सारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या करणने अलीकडेच आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल खुलेपणाने सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडियावर तो अभिनय क्षेत्र सोडणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर करणने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, “आध्यात्मिकतेकडे वळलो म्हणजे काम सोडणार असा अर्थ होत नाही. कृपया केवळ व्हायरल होण्यासाठी चुकीच्या अफवा पसरवू नका.” त्याने संबंधित पोस्ट हटवण्याची विनंतीही केली.
एका मुलाखतीत त्याने सांगितले की, मागील काही महिन्यांपासून तो अध्यात्माकडे अधिक आकर्षित झाला आहे. तो नीम करोली बाबा यांचा अनुयायी असून, त्यांच्या माध्यमातून त्याची प्रेमानंद महाराज यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या प्रवचनांमुळे नामस्मरणाचे महत्त्व त्याला उमगल्याचेही त्याने नमूद केले.
करणच्या मते, नामजपामुळे मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवता येते. दरम्यान, कामाच्या बाबतीत तो अद्याप सक्रिय असून, अलीकडेच SonyLIV वरील ‘रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी’ या मालिकेत तो झळकला होता.
एकूणच, आध्यात्मिकतेकडे झुकाव वाढला असला तरी करण वाही अभिनय क्षेत्रातून बाहेर पडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.