
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिल अखेर जवळ आली तरीही रक्कम खात्यात जमा न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून हप्ते उशिराने मिळत असून, यावेळीही तोच प्रकार पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्यात येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात पैसे जमा झाले होते, त्यामुळे यावेळीही महिनाअखेरीस हप्ता मिळू शकतो, अशी अपेक्षा आहे.
सध्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आल्याने पुढील काही दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
याचबरोबर, लाभार्थ्यांसाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून ती पूर्ण करण्यासाठी आता केवळ सात दिवस उरले आहेत. केवायसी अपूर्ण राहिल्यास किंवा त्यात त्रुटी असल्यास योजनेचा लाभ थांबवला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, हप्त्याबाबतचा अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, महिलांचे लक्ष आता पुढील काही दिवसांकडे लागले आहे.