बारामती पोटनिवडणूक, सुनेत्रा मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य

    23-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बारामती : राज्यातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना राजकीय वातावरण तापले आहे. मतदान केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया देत, “सुनेत्रा पवार या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या, तर आम्हाला आनंदच होईल,” असे स्पष्टपणे सांगितले.

बारामती येथे ही पोटनिवडणूक माजी आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर होत असून, त्यांच्या जागी सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मात्र, त्यांना २० हून अधिक अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे.

मतदानानंतर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यावश्यक आहे. “याच भावनेतून आम्ही मतदानासाठी आलो आहोत,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, शरद पवार हे वैद्यकीय कारणांमुळे मतदानासाठी उपस्थित राहू शकले नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, “कुटुंबासाठी हा भावनिक क्षण आहे. आम्ही एका जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. मात्र, सुनेत्रा पवार या मोठ्या फरकाने विजयी होतील, असा आम्हाला विश्वास आहे. पक्षातील सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे.”

दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटिशीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “आमच्या नेत्यांवर अनेकदा आरोप झाले, पण अन्याय झाला तरी आम्ही कधीही नोटिसांचा मार्ग अवलंबला नाही.”

रोहित पवार प्रकरणावरही भाष्य-
विशेष न्यायालयाने रोहित पवार यांना राज्य सहकारी बँक प्रकरणातील आरोपांतून दिलासा दिल्यानंतर त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “रोहित पवार यांना ‘क्लीन चिट’ मिळणार हे अपेक्षितच होते. सत्य काही काळ दडपले जाऊ शकते, पण पराभूत होत नाही,” असे त्या म्हणाल्या.

याच प्रकरणात माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनाही अंमलबजावणी संचालनालयाकडून दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट भूमिका-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर तो आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असेल.”