
Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘लालपरी’ला नवे आकर्षक रूप देण्यासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची एसटीचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढील पाच वर्षांसाठी या लोकप्रिय जोडीवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक करणे, प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करणे तसेच रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या नियुक्तीनंतर रितेश देशमुख यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, त्यांचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यांनीही परिवहन खात्याची धुरा सांभाळली होती, त्यामुळे एसटीशी त्यांचे नाते अधिक घट्ट आहे.
यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते दिवंगत विक्रम गोखले आणि मकरंद अनासपुरे यांनीही एसटीचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम पाहिले आहे.
दरम्यान, रितेश आणि जेनेलिया देशमुख ही जोडी त्यांच्या ‘राजा शिवाजी’ या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहे. त्यांच्या निवडीमुळे विशेषतः तरुणांमध्ये ‘लालपरी’बद्दल आकर्षण वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.