पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण; ‘दहशतवादासमोर भारत कधीच झुकणार नाही’,पंतप्रधान मोदी यांचे विधान

    22-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

जम्मू-काश्मीर : पहलगाम दहशतवादी हल्ला या हृदयद्रावक घटनेच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

X वरून प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले की, “गेल्या वर्षी झालेल्या या क्रूर हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांची आठवण सदैव जिवंत राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, राष्ट्र म्हणून भारत एकजूट असून दहशतवाद्यांचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ दिले जाणार नाही.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही हल्ल्यातील बळींना अभिवादन करत तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी नमूद केले की, अशा भ्याड कृत्यांना भारत आता अधिक ताकदीने आणि ठोस भूमिकेतून उत्तर देत आहे. देशाच्या एकतेला धक्का देणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथील बैसरन भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत गोळीबार केला होता. लष्करी वेशात आलेल्या हल्लेखोरांनी ओळख तपासून नागरिकांवर हल्ला चढवला. या घटनेत २६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे शहीदांना आदरांजली वाहण्यात येत असून, दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करण्यात येत आहे.