उष्णतेच्या वाढत्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची पुढाकार; आयआयएम नागपूरमध्ये नवे संशोधन केंद्र सुरू

    22-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमान आणि हवामान बदलाच्या परिणामांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयआयएम नागपूर येथे ‘हीट रेझिलियन्स अँड सस्टेनेबल कूलिंग’ उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहातून ऑनलाइन माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.

हे अत्याधुनिक केंद्र राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेशी संलग्न राहून उष्णतेच्या लाटा, तापमानवाढ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर संशोधन व उपाययोजना विकसित करणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसत असून, लहान शेतकरी विशेषतः अडचणीत सापडत आहेत. विदर्भासारख्या भागात तापमानात झालेल्या वाढीमुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.

या केंद्राच्या माध्यमातून ‘उष्णता कृती आराखडा’ आणि ‘शहरी हवामान कृती योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाणार आहे. निवडक शहरांना आणि जिल्ह्यांना तांत्रिक मदत देऊन उष्णतेशी लढण्याची क्षमता वाढवली जाणार आहे.

तसेच, या योजनांची अंमलबजावणी सक्षमपणे व्हावी यासाठी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. उष्णतेतही कमी वीज वापरून थंडावा मिळावा यासाठी बांधकाम क्षेत्रात पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि साहित्य वापरण्यालाही प्रोत्साहन दिले जाईल.

राज्य शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.