
Image Source:(Internet)
पहलगाम : येथील भीषण दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी या कटाचा मुख्य सूत्रधार साजिद जट्ट अद्याप मोकाट आहे. ‘लष्करे तैय्यबा’ आणि ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनांशी त्याचे संबंध असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. साजिद ओळख लपवून पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी वास्तव्य बदलत असल्याची माहिती समोर आली असून भारतीय गुप्तचर यंत्रणा त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या प्रकरणाचा तपास करत असून साजिद व त्याच्या सहकाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. गुप्तचर संस्थांच्या दबावामुळे तो वारंवार ठिकाण बदलत असल्याचेही उघड झाले आहे. काही काळ तो रावळपिंडी येथे भाड्याच्या घरात राहत होता, अशी माहिती समोर आली असून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय त्याला संरक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
‘भारत विसरलेला नाही’ – लष्कराचा इशारा-
हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त काश्मीर खोऱ्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. “भारत काहीही विसरलेला नाही; मानवतेच्या सीमा ओलांडणाऱ्यांना ठोस प्रत्युत्तर दिले जाईल,” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
हल्ल्याची भीषणता आणि उद्देश-
‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह २६ भारतीयांचा निर्दयीपणे बळी घेण्यात आला होता. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केल्याने देशभर संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यामागे पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे आणि सामाजिक ऐक्य बिघडवणे हा उद्देश असल्याचे मानले जाते.
ऑपरेशन सिंदूरनंतरही प्रश्न कायम-
हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करून मोठा फटका दिल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्ष हल्लेखोर आणि त्यांच्या स्थानिक मदतनीसांना पूर्णतः शिक्षा देण्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याची टीका होत आहे. तपासात १५९७ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून अनेक दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे नमूद आहे.
बळींच्या कुटुंबीयांचे प्रश्न अनुत्तरित-
सरकारने जाहीर केलेली मदत आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. काही कुटुंबांना नोकऱ्या मिळाल्या असल्या तरी अनेकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी जाहीर केलेल्या मदतीची अंमलबजावणीही अपुरीच राहिल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
सुरक्षा आणि राजनैतिक आव्हाने कायम-
दरम्यान, सीमाभागात पाळत ठेवण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केल्याचे प्रकार समोर येत आहेत. तसेच पाकिस्तानकडून होणारी भडकाऊ विधाने आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम लक्षात घेता भारतासमोर सुरक्षा, सामाजिक आणि राजनैतिक अशी बहुआयामी आव्हाने उभी आहेत.
पहलगाम हल्ल्याची जखम आजही ताजी असून, दहशतवादाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी अधिक ठोस आणि सर्वंकष कारवाईची गरज अधोरेखित होत आहे.