
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील जरिपटका परिसर बुधवारी दुपारी अक्षरशः हादरला, जेव्हा नारा घाट पुलाखाली बोरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तपासात हा मृतदेह झिंगाबाई टाकळी येथील ३८ वर्षीय हॉटेल व्यावसायिक राहुल सुनील साहू याचा असल्याचे स्पष्ट झाले.
राहुल साहू हा सदर परिसरातील अचरज टॉवरमध्ये “हॅप्पी डे” हॉटेल चालवत होता. दोन दिवसांपूर्वी तो कोणाकडून पैसे घेण्यासाठी जात असल्याचे सांगून मोपेडवरून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो परतलाच नाही. मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी चिंतेतून सदर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली होती.
दरम्यान, बुधवारी काही नागरिकांना नारा घाट पुलाखाली संशयास्पद अवस्थेत बोरी दिसून आली. माहिती मिळताच जरिपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बोरी उघडताच आतमध्ये राहुल साहूचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात खळबळ उडाली.
प्राथमिक तपासानुसार, ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपींनी राहुलची इतरत्र हत्या करून पुरावे लपवण्यासाठी मृतदेह बोरीत भरून पुलाखाली टाकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी केली असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
या घटनेमुळे शहरात भीतीचे सावट पसरले असून, पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मृत राहुल साहू यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.