नाशिकमध्ये अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा; प्रकरणांची संख्या १५ वर

    22-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : अध्यात्म, तंत्र-मंत्र आणि चमत्कारांच्या आडून महिलांचे शोषण तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपांनी चर्चेत असलेला स्वयंघोषित तांत्रिक अशोक खरात याच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, एकूण प्रकरणांची संख्या आता १५ वर पोहोचली आहे.

ताज्या तक्रारीनुसार, खरातने ‘जगदंबा ग्रामीण बिगर कृषी पतसंस्था’ची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बनावट बँक खाती तयार करून सुमारे ५७ लाख ९० हजार रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी केवळ खरातवरच नव्हे, तर संबंधित पतसंस्थेच्या संचालक मंडळावरही गुन्हा दाखल करत तपासाची दिशा व्यापक केली आहे.

दरम्यान, एका महिलेने ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत धक्कादायक आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, ठाणे महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी तिला खरातकडे नेले, जिथे तिच्यावर अत्याचार झाले. या आरोपांमुळे प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आहेर आणि खरात यांच्यातील संभाव्य संबंधांची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या माहितीनुसार, खरातविरुद्ध नोंद असलेल्या प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.