
Image Source:(Internet)
अमरावती: जिल्ह्यातील परतवाडा परिसरात तरुणींच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आलेल्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला अचलपूर येथील समरसपुरा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली.
गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. आरोपीला भररस्त्यातून फिरवताना नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती, तर अनेकांनी या कारवाईचे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली.
दरम्यान, तपासादरम्यान आरोपीने काही महत्त्वाचे पुरावे आपल्या मित्राकडे लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या पुराव्यांमध्ये मोबाईल, मेमरी कार्ड किंवा इतर डिजिटल साधनांचा समावेश असण्याची शक्यता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.
समरसपुरा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीला या कृत्यात इतर कोणाची साथ होती का, याचाही शोध घेतला जात आहे. प्रकरणाच्या तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.