आदिल शाह यांच्या कुटुंबाला नवे घर; एकनाथ शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण

    22-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

जम्मू-काश्मीर : एकनाथ शिंदे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आदिल शाह यांच्या कुटुंबीयांना दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवले आहे. नव्याने उभारलेल्या घराच्या चाव्या कुटुंबीयांच्या हाती सुपूर्द करून त्यांनी माणुसकीचा आदर्श ठेवला.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना आदिल शाह यांनी प्राणांची आहुती दिली होती. बैसरन खोऱ्यात खेचर चालवण्याचे काम करणाऱ्या आदिल यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला होता.

या दुर्दैवी घटनेनंतर शिवसेना कडून आदिल यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली होती तसेच त्यांच्यासाठी पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या वचनाची पूर्तता करत नव्या घराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, त्या निवासस्थानाला “आनंदनाथ भवन” असे नाव देण्यात आले आहे. हे नाव आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे.

या भावनिक सोहळ्यात शिंदे हे मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. आदिल शाह यांच्या बलिदानाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “आदिल हा केवळ एक युवक नव्हता, तर देशभक्तीचे प्रतीक होता. त्याने धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी आपले प्राण अर्पण केले.”

हा कार्यक्रम आदिल यांच्या मूळ गावी हापटनार येथे पार पडला. यावेळी मंत्री संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.