नागपुरात रणजी स्पर्धेच्या नावाखाली २० लाखांचा गंडा; दोन तरुण क्रिकेटपटूंची फसवणूक

    21-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोन तरुण क्रिकेटपटूंना तब्बल २० लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी काझी झीशान अहमद याचा शोध सुरू आहे.

तक्रारदार कोल्लू वीरा वेंकट फनिंद्र कुमार (वय २७), रा. विजयवाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजमाध्यमावर आरोपीचा क्रिकेटचा व्हिडिओ पाहून त्यांच्यात संपर्क झाला. त्यानंतर जून २०२३ मध्ये ते नागपुरात येऊन मिहान परिसरातील DY Patil Sports Academy येथे आरोपीची भेट घेतली. यावेळी आरोपीने दुसऱ्या राज्याच्या संघातून रणजी स्पर्धेत स्थान मिळवून देण्याचे आश्वासन देत विश्वास संपादन केला.

यानंतर आरोपीने विजयवाड्यात जाऊन तक्रारदाराच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी रक्कम लागेल, असे सांगितले. याच काळात तक्रारदाराचा मित्र राजाकुंटला मुनींद्र (वय २४), रा. नंद्याल यालाही अशाच प्रकारे आमिष दाखवण्यात आले. दोघांनीही आरोपीवर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवली. एकूण २० लाख २ हजार रुपये आरोपीच्या खात्यात जमा करण्यात आले.

मात्र पैसे दिल्यानंतरही कोणतीही संधी न मिळाल्याने आणि आरोपीकडून सतत टाळाटाळ होत असल्याने दोघांनाही फसवणुकीची जाणीव झाली. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला असून, अशा आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.