
Image Source:(Internet)
वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आक्रमक आंदोलन उभारण्यात आले. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आणि कार्यकर्त्यांचा रोष उघडपणे दिसून आला.
या आंदोलनाचे आयोजन वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच वणी विधानसभा प्रमुख साकेत अविनाश भुजबलराव यांनी नेतृत्व करत आंदोलनाची धुरा सांभाळली.
मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शहर प्रमुख विनोद ढुमणे, उपशहर प्रमुख राजू पाटील, समीर लेंगुळे, प्रकाश कराड, मोरेश्वर यांच्यासह नगरसेवक सुधीर थिरे, अनिकेत बदकल, अजय ढोबे, शत्रुघन मालेकर, गुलाब आवारी आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान उपस्थितांनी स्पष्ट इशारा दिला की, महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारी कोणतीही विधाने सहन केली जाणार नाहीत. अशा प्रवृत्तीविरोधात आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम संदेश शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.