नागपुरात भीषण अपघात; इलेक्ट्रिक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    21-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संविधान चौकाजवळील मॉरिस कॉलेज बसथांब्याजवळ इलेक्ट्रिक बसच्या धडकेत ४५ वर्षीय रितेश सातपुते यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सातपुते हे आपल्या दुचाकीवरून सिग्नल पार करून झिरो माईलकडे जात असताना मागून वेगात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावर कोसळले आणि बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

रितेश सातपुते हे औषध वितरणाचे काम करत होते. नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडलेले सातपुते पुन्हा घरी परतू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत बसचालक शेख सरवर शेख सगीर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, संविधान चौक ते मॉरिस कॉलेज परिसर हा अपघातप्रवण म्हणून ओळखला जात असून, वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे येथील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या भागात कडक वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा अंमलबजावणी आणि सिग्नल व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.