
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यातील वाढत्या उष्णतेदरम्यान आता अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असून पुढील सुमारे १२० तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग यांनी २१ ते २४ एप्रिल दरम्यान विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी गारपीट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार वारे आणि गारांचा मारा होऊ शकतो. विशेषतः पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भातील अमरावती आणि वर्धा येथे उष्णतेची लाट कायम राहणार असून या भागांसाठी ‘पिवळा इशारा’ देण्यात आला आहे.
संभाव्य आपत्ती लक्षात घेता राज्य सरकारने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क ठेवण्यात आली असून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलांना तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास नागरिकांसाठी शाळा व शासकीय इमारती तात्पुरत्या निवाऱ्यासाठी खुल्या ठेवण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना वीजांच्या कडकडाटाच्या वेळी शेतात काम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बांधकामे आणि मोठे सार्वजनिक कार्यक्रम तात्पुरते स्थगित करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
२५ एप्रिलपर्यंतचा कालावधी संवेदनशील असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत हवामान अंदाजावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.