Image Source:(Internet)
नाशिक :
महाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, खरातच्या आर्थिक व्यवहारांचीही ईडीमार्फत चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, खरातविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पीडित महिला पुढे येत आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात खरातविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत.
यामध्ये आठ गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित असून, एक फसवणुकीचा गुन्हा आहे. या प्रकरणांचा तपास सध्या एसआयटीकडे आहे. दरम्यान, चौथ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर शनिवारी खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी राखून ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.
न्यायालयाने ही मागणी मान्य करत खरातला ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल पाचव्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग उघड झाल्याचे तपास पथकाने सांगितले आहे. या प्रकरणात पुढील चौकशीसाठी त्याच्या ताब्याचा अर्जही न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असतानाही त्याला पुढील गुन्ह्यांमध्ये अटक करून पुन्हा पोलीस कोठडीत घेतले जात आहे.
या प्रकरणातील काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांमध्ये बदनामीची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे सुरुवातीला तक्रारी देण्यास कोणी पुढे येत नव्हते. मात्र पोलिसांनी महिलांना विश्वासात घेत त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर पीडित महिलांना धीर मिळाला आणि त्यांनी तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली.
विशेष हेल्पलाईनवर दररोज पाच ते सहा तक्रारी येत असून, गेल्या वीस दिवसांत शेकडो तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारींमध्ये लैंगिक शोषणाबरोबरच आर्थिक फसवणूक, धमकावणे आणि व्यवहारातील गैरप्रकारांचा समावेश आहे.
आतापर्यंत पोलिसांनी सुमारे ४० जणांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, खरातला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.