पंचायत राज विभागाला भरघोस निधी; ग्रामस्वच्छतासह कचरा व्यवस्थापनाला नवी गती

    20-Apr-2026
Total Views |
 
Panchayat Raj Dept
 Image Source:(Internet)
 
जिल्हा परिषदेच्या पंचायत राज (Panchayat Raj) विभागासाठी यंदाचा अर्थसंकल्प विशेष ठरला असून, अनेक वर्षांनंतर या विभागाच्या निधीत मोठी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी केवळ दहा लाख रुपयांपुरता मर्यादित असलेला निधी यंदा थेट ३ कोटी ७ लाखांवर पोहोचला आहे. या वाढीमुळे विभागाच्या कामकाजाला नवे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
 
जिल्हा परिषदेकडून विविध विभागांना निधी वाटप करताना यंदा पंचायत राज विभागाला प्राधान्य देण्यात आले आहे. या निधीच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील स्वच्छता सुधारण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.
 
ग्रामपंचायतींमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, त्यावर प्रक्रिया आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. यासोबतच गावांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. वाढत्या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता, शाश्वत उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.
 
ग्रामीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्य आणि केंद्र सरकारकडून पंचायत राज विभागाला दिलेला हा वाढीव निधी महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे ग्रामपंचायती अधिक सक्षम होऊन स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. वाढलेल्या निधीमुळे पंचायत राज विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या माध्यमातून गावांच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.