Image Source:(Internet)
नाशिक :
शहरातील आयटी (IT) कंपनीत समोर आलेल्या धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाचा तपास आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. मुख्य संशयित शफी शेख आणि रझा मेमन यांना ATS ने ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली आहे.
यापूर्वी या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू होता. मात्र प्राथमिक चौकशीत काही संवेदनशील बाबी उघड झाल्यानंतर राज्य स्तरावर हा तपास ATS कडे वर्ग करण्यात आला. तपास यंत्रणांकडून आता या प्रकरणाचा व्यापक स्तरावर छडा लावला जात असून, धर्मांतरण आणि अत्याचाराबरोबरच संघटित रॅकेट, परदेशी संबंध आणि संशयित आर्थिक व्यवहार यांचाही बारकाईने तपास केला जात आहे.
आरोपींवर आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून धर्मांतरण घडवून आणण्याचा आणि नकार दिल्यास त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पीडितांची संख्या अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शहरात संताप व्यक्त होत आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकच्या औद्योगिक तसेच सामाजिक वातावरणात खळबळ उडाली असून, ATS च्या तपासातून पुढे काय उघड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.