शिक्षकांच्या बदल्या रखडल्या; जनगणना २०२६मुळे सरकारचा मोठा निर्णय

    20-Apr-2026
Total Views |
 
Teacher transfers
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील शिक्षक (Teacher) आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत सरकारने २०२६ मधील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आगामी जनगणना सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे शिक्षकांसह हजारो कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
 
ग्रामविकास विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी करत सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या निर्णयानुसार जिल्हा परिषदांतील ‘गट-क’ आणि ‘गट-ड’ संवर्गातील कर्मचारी तसेच शिक्षकांच्या नियमित बदल्या यंदा होणार नाहीत.
 
या निर्णयामागे केंद्र सरकारचे निर्देश महत्त्वाचे ठरले आहेत. ११ मार्च २०२६ रोजी केंद्रीय गृह सचिवांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात जनगणनेच्या कामात शिक्षक, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले होते. मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्यास जनगणनेच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती.
 
केंद्राने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान ‘स्व-गणना’ टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रत्यक्ष घरगुती माहिती संकलनाचा टप्पा राबवला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी राज्यभरात सुमारे २.६४ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, ते डिजिटल माध्यमातून घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत.
 
दरम्यान, दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या बदली प्रक्रियेची अनेक शिक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. मूळ गावी किंवा सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी अनेकांनी तयारीही केलेली असते. मात्र, यंदा अचानक स्थगिती आल्याने शिक्षक वर्गात नाराजी पसरली आहे. वैयक्तिक नियोजन, कुटुंबीयांच्या सोयी आणि इतर कारणांसाठी अपेक्षित असलेल्या बदल्या रद्द झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.