‘एक माहिती… थेट १ लाख!’ वाशिम प्रशासनाचा कन्याभ्रूणहत्येविरुद्ध मोठा ‘स्ट्राइक’!

    02-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

वाशिम : कन्याभ्रूणहत्येसारख्या अमानवी प्रकारांवर लगाम घालण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने धडाकेबाज निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांची खात्रीशीर माहिती देणाऱ्याला थेट १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या घोषणेमुळे अवैध कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबवली जात असून, पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांतर्गत होणाऱ्या गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. माहितीच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यासच १ लाखांचे रोख बक्षीस दिले जाईल. त्यामुळे नागरिकांना निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समाजात मुलगा-मुलगी भेद संपवण्यासाठी आणि लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाशिममध्ये आता ‘मुलगी वाचवा’ मोहिमेला नवे बळ मिळाल्याचे चित्र आहे.