
नाशिक : भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातच्या कारनाम्यांची व्याप्ती आता आणखी मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने अनेक व्यक्तींची आधार व पॅन कार्डची कागदपत्रे वापरून विविध बँका आणि पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाती उघडल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, या अनेक खात्यांचा नॉमिनी स्वतः खरात असल्याची बाब उघड झाली आहे. या खात्यांद्वारे सुमारे १०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याच प्रकरणात आणखी एक खळबळजनक दावा समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने असलेल्या एका बँक खात्याचा नॉमिनी देखील अशोक खरात असल्याची चर्चा आहे. या दाव्यामुळे प्रकरणाला राजकीय वर्तुळात नवे वळण मिळाले आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, संबंधित अनेक खात्यांना एकच मोबाईल क्रमांक जोडलेला असून तो खरातचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व खात्यांवर त्याचे थेट नियंत्रण असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. या संदर्भात काही पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत असून तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
दरम्यान, याआधी समोर आलेल्या छायाचित्रांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर आता या नव्या माहितीनंतर प्रकरण अधिकच गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासातून पुढे आणखी काय उघड होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.