मुंबई :नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईने पुन्हा डोके वर काढले असून सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. जागतिक घडामोडी आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्यासह आता दुधाच्या (Milk) दरातही वाढ झाली आहे.
१ एप्रिलपासून विविध नियमांमध्ये बदल लागू झाले असताना, दैनंदिन वापरातील वस्तू महाग झाल्याने नागरिकांना आर्थिक ताण जाणवत आहे. दुधाच्या किमतीत प्रति लिटर सुमारे २ ते ४ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ, उज्जैन आणि जबलपूर या शहरांमध्ये या दरवाढीचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला. काही ठिकाणी ६० रुपयांना मिळणारे सुटे दूध आता ६३ रुपयांपर्यंत विकले जात आहे. स्थानिक मागणी-पुरवठ्यानुसार इतर भागांतही दर वाढल्याचे दिसते.
दूध विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्याचबरोबर पशुखाद्य महागले असून उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन घटते आणि त्याचा थेट परिणाम दरांवर होतो.
याशिवाय एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किमतीत वाढ झाल्याने विमान कंपन्यांच्या खर्चातही वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये या दरवाढीचा प्रभाव दिसून येत आहे.
दरम्यान, इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही कमतरता नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा सुरू असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी उत्पादन वाढवण्यात आले आहे.