वैज्ञानिक आणि धम्म प्रशिक्षकांचे मार्गदर्शन; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर प्रबोधन कार्यक्रम

    02-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे भव्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आंबेडकरी विचारवंत, तत्त्वज्ञानी, भाष्यकार, वैज्ञानिक आणि धम्म प्रशिक्षक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्म सेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली येथील तत्त्वज्ञानी आकाश खोब्रागडे, तामिळनाडूचे वैज्ञानिक आणि आंबेडकरी विचारांचे प्रबोधनकार डॉ. डी. आर. एस. शेखर, नालंदा अकॅडमी वर्धाचे संस्थापक अनुप कुमार तसेच बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भंते धम्मसारथी उपस्थित राहणार आहेत.

१४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दीक्षाभूमीच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या वेळी मान्यवर बाबासाहेबांच्या विचारांवर आणि कार्यावर सखोल मार्गदर्शन करणार असून, आधुनिक राष्ट्रनिर्मितीत बाबासाहेबांचे योगदान, शिक्षित समाजाकडून अपेक्षा, समाजाची सध्याची दशा आणि दिशा तसेच धम्माचा प्रचार-प्रसार या विषयांवर विचार मांडले जाणार आहेत.

बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, ते अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांनी हे विचार आचरणात आणावेत, अशी अपेक्षा भदंत ससाई यांनी व्यक्त केली.