परतवाडा प्रकरणावरून वाद चिघळला; प्यारे खान यांची नवनीत राणा यांना पक्षातून काढण्याची मागणी

    17-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील कथित लैंगिक शोषण आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणात राज्य सरकारने ३६ सदस्यीय एसआयटीची स्थापना केली असून, मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला आहे.

नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना प्यारे खान यांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले. “परतवाडा प्रकरणात हिंदू मुलींचा सहभाग असल्याचा खोटा दावा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. “अशा प्रकारचे विधान एका महिला नेत्या म्हणून त्यांना शोभणारे नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

महिला आरक्षणाचा संदर्भ देत खान म्हणाले, “एकीकडे नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणासाठी पावले उचलत आहेत, तर दुसरीकडे अशा वक्तव्यांमुळे समाजात गोंधळ निर्माण होतो.” त्यांनी पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला असून, “अशा प्रकरणांत पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील,” असे स्पष्ट केले.

राणा यांच्यावर टीका करताना त्यांनी “समाजात दंगल भडकवण्याचा प्रयत्न होत आहे,” असा आरोप केला. “खोट्या माहितीच्या आधारावर लोकांना भडकवले जात आहे, हे अत्यंत धोकादायक आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, या सर्व प्रकरणावरून प्यारे खान यांनी नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवनीत राणा यांना भारतीय जनता पार्टी मधून तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे.

“देशाची एकता आणि शांतता टिकवण्यासाठी जबाबदार नेत्यांनी संयमाने वक्तव्य करणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे विधान देशाला तोडण्याचे काम करू शकते,” असा इशारा देत खान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.