
Image Source:(Internet)
नाशिक : आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिक युनिटमधील वादग्रस्त प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील फरार एचआर मॅनेजर निदा खान गर्भवती असल्याची माहिती समोर आली असून, ती सध्या मुंबईत असल्याचे सांगितले जात आहे.
TCS नाशिक युनिटमध्ये महिलांवर लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतराचा दबाव टाकल्याच्या तक्रारींमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले आहे. या सर्व तक्रारी एचआर विभागाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, एचआर प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या निदा खान यांनी या तक्रारी योग्य पद्धतीने हाताळल्या का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणात पोलिसांना निदा खानची चौकशी करायची असून, ती सध्या फरार आहे. दरम्यान, तिने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आपल्या अर्जात तिने वैद्यकीय कारणांचा उल्लेख करत संरक्षणाची मागणी केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, २५ वर्षीय निदा खानने २०२१ साली TCS नाशिकमध्ये नोकरीला सुरुवात केली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या महिला एचआर अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे आयटी क्षेत्रातील कामकाज आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिस तपास अधिक वेगाने सुरू असल्याची माहिती आहे.