
Image Source:(Internet)
नागपूर : शहरासह जिल्ह्यात तीव्र उष्णतेने थैमान घातले असून परिस्थिती गंभीर बनली आहे. सलग वाढणाऱ्या तापमानामुळे आणि उष्णतेच्या लाटेच्या (हीटवेव्ह) पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत १८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी केंद्रे तसेच कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरात तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कडक उन्हामुळे आणि उष्ण वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले आहे. घरातही उकाडा जाणवत असून एसी आणि कूलरमुळेच काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
India Meteorological Department (IMD) ने नागपूर परिसरासाठी तीव्र उष्णतेचा इशारा देत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील २ ते ३ दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, आरोग्याच्या दृष्टीने धोका वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रशासन आणि हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक असल्यासच बाहेर जावे आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उष्णतेपासून बचावासाठी उपाय :
• सैल व हलके कपडे परिधान करावेत
• अधिकाधिक पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे
• उन्हात बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा गॉगलचा वापर करावा
• लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी
नागपूरातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.