ड्रग्स रोखण्यात सरकार अपयशी? “पोलिसांना फ्री हँड द्या”; अमित ठाकरे यांचा संताप

    17-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : मुंबईतील ड्रग्स प्रकरण, नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या घटनांवरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारत, “ड्रग्स थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही का?” असा जळजळीत सवाल केला.

राज्यात वाढत्या ड्रग्स तस्करीबद्दल संताप व्यक्त करत ठाकरे म्हणाले की, “प्रत्येक शहरात ड्रग्स सापडत आहेत, विकले जात आहेत. हे थांबवण्यासाठी ठोस कारवाई का होत नाही? शाळांच्या परिसरातसुद्धा ड्रग्स विकले जात आहेत, ही अत्यंत भीषण बाब आहे.” त्यांनी या प्रकरणात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत, “अशा आरोपींना सगळ्यात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे ठामपणे सांगितले.

पोलिसांना अधिक अधिकार देण्याची मागणी करत ते म्हणाले, “पोलिसांना २४ तासांसाठी फ्री हँड दिल्यास गुन्हेगारांवर आळा बसेल. सरकारने पोलिसांवर विश्वास ठेवून त्यांना मोकळीक द्यावी.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “जर आम्ही सत्तेत असतो, तर अशा आरोपींना थेट फाशीची शिक्षा दिली असती आणि एक उदाहरण निर्माण केले असते.”

संघटनात्मक कामांबाबत बोलताना ठाकरे यांनी सांगितले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर संपर्क अध्यक्ष नेमले असून, लवकरच कार्यकर्त्यांशी ‘वन-टू-वन’ संवाद साधला जाणार आहे. “आम्ही २५ आणि २६ एप्रिलला ग्रामीण भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. त्यानंतर सविस्तर अहवाल तयार करून राज ठाकरे यांना सादर करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ड्रग्स प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स राज्यात येतात कुठून? याचे अचूक आकडे सरकारकडे नाहीत का?” त्यांनी सर्व कंपन्यांचे १०० टक्के ऑडिट करण्याची मागणी करत, “आपल्या कंपनीत कोण काम करतं, याची जबाबदारी व्यवस्थापनाने घ्यायला हवी,” असेही नमूद केले.

“प्रशासनाने ही समस्या गांभीर्याने हातात घेतली पाहिजे. आम्ही रस्त्यावर उतरणारच आहोत, पण सरकारने ठोस कारवाई करणे गरजेचे आहे,” असा इशारा देत ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.