
Image Source:(Internet)
महाराष्ट्र विधानपरिषदेतील ९ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून मतदानाची प्रक्रिया सकाळी ९ वाजता सुरू होऊन दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतदान संपताच त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
विधानपरिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. सध्याच्या राजकीय गणितानुसार भाजपला पाच, शिवसेनेला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे आणि महायुतीकडून संभाव्य अतिरिक्त उमेदवार देण्याच्या शक्यतेमुळे निवडणूक बिनविरोध न होता चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.
विधानसभेतील विद्यमान संख्याबळ पाहता महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या एकत्रित संख्याबळाच्या आधारावर महायुतीचे मोठ्या संख्येने उमेदवार सहज विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तर महाविकास आघाडीला मर्यादित संख्याबळामुळे केवळ एकच जागा निश्चित मानली जात आहे, दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.