
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यात चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया देत सरकार आणि व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील प्रभादेवी येथे झालेल्या कै. काकासाहेब पुरंदरे सन्मान सोहळ्यात बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले स्पष्ट आणि परखड मत मांडले.
राज ठाकरे म्हणाले की, “जिथे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नाही, तिथे खरातसारख्या प्रकरणात मात्र सगळं सुरळीत चालतं.” अशा घटनांचा वापर विशिष्ट हेतूंसाठी केला जात असल्याचा सूचक आरोपही त्यांनी यावेळी केला. या प्रकारांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी माध्यमांवरही अप्रत्यक्ष टीका केली. आजची पत्रकारिता ‘काहीतरी घेऊन या’ या दडपणाखाली चालते, त्यामुळे अनेकदा बातम्या अतिरंजित पद्धतीने समोर येतात, असे त्यांनी नमूद केले. काही माध्यमे आणि पत्रकार सत्ताधाऱ्यांच्या जवळ काम करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
वृत्तपत्र सुरू करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले. जाहिरातींवर अवलंबून असलेल्या माध्यम व्यवस्थेत स्वतंत्रपणे काम करणे कठीण असल्याने वृत्तपत्र सुरू करण्याचा विचार त्यांनी पुढे नेला नाही, असे ते म्हणाले.