
Image Source:(Internet)
अमरावती : परतवाडा परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. प्रेमाच्या नावाखाली तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्यासह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या कृत्यांमुळे समाजमन संतप्त झाले आहे.
अयान अहमद याने प्रेमाचे नाटक करत तब्बल आठ तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवले. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने त्यांच्या जवळीक साधत शारीरिक शोषण केले. इतक्यावरच न थांबता त्याने या तरुणींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो तयार करून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या तपासात आरोपीच्या मोबाईलमधून अठरा अश्लील व्हिडिओ आणि एकोणचाळीस आक्षेपार्ह छायाचित्रे जप्त करण्यात आली आहेत. दोन तरुणींचे थेट व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते, तर इतर सहा जणींचे फोटो वापरून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात होते.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता अमरावती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या संपूर्ण प्रकरणामागील आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.