ठाकरे घराण्याची तिसरी पिढी पुढे? आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा येण्याची शक्यता

    15-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : विधानसभेतील पराभवाचा धक्का आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील सत्ता राखण्यात आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या बदलांची चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तरुण नेतृत्व पुढे करण्याचा प्रयत्न सुरू असून, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पक्षाचा वर्धापन दिन १९ जून रोजी साजरा होणार असून, त्याच दिवशी आदित्य ठाकरे यांच्या नावाची औपचारिक घोषणा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हही ठाकरे गटापासून दूर गेले. या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय फटका बसला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने समाधानकारक कामगिरी केली असली, तरी विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यातच मुंबई महानगरपालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यात अपयश आल्याने संघटनात काहीशी मरगळ निर्माण झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षात नवसंजीवनी आणण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर भर दिला जात आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी संघटनात्मक कामात लक्षणीय सक्रियता दाखवली आहे. शिवसेना भवन येथे होणाऱ्या जिल्हाप्रमुख व विभागप्रमुखांच्या बैठकींना ते नियमित उपस्थित राहत असून, संघटनेवर आपली पकड मजबूत करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या चर्चेला दुजोरा दिला आहे. “उद्धव ठाकरे स्वतः कार्याध्यक्ष झाले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या नावावर विचार होणे स्वाभाविक आहे. आता नेतृत्व तरुणांच्या हाती देण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे येत्या वर्धापन दिनी आदित्य ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.