
Image Source:(Internet)
अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूर परिसरात तरुणींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाच्या निषेधार्थ आज परतवाडा आणि अचलपूर येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. विविध स्तरांतील नागरिक, व्यापारी आणि संघटनांनी या बंदला मोठा प्रतिसाद दिला. सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवत दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेचा धागा अत्यंत भयावह स्वरूपाचा असल्याचे तपासात समोर येत आहे. मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या साथीदारांनी सामाजिक माध्यमांचा वापर करून तरुणींशी मैत्री केली, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करत अश्लील व्हिडिओ तयार केले. यानंतर या व्हिडिओंचा आधार घेत संबंधित तरुणींना ब्लॅकमेल करण्यात आले आणि अखेरीस हे व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलमधून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर अमरावती जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापले असून विविध नेत्यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी सखोल तपासाची मागणी केली असून खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करण्याची गरज व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर तसेच बडनेरा येथील आमदार रवी राणा यांनीही आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेला अत्यंत अमानुष आणि संतापजनक संबोधत दोषींना कोणतीही दया न दाखवता कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
ही घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून समाजातील विश्वास आणि नातेसंबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. मैत्री आणि विश्वासाच्या आड दडलेल्या अशा प्रवृत्ती ओळखणे आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करणे, ही आज समाजासमोरची मोठी गरज बनली आहे.