बीडमध्ये पुन्हा शेतकऱ्याची आत्महत्या; आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे नातेवाईकांना दोन तासांचा मनस्ताप

    15-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बीड : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना बोरखेड येथे पुन्हा एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून ५२ वर्षीय शेतकरी लक्ष्मण भानुदास क्षीरसागर यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश परझने, मन्सुर शेख आणि अविनाश घुंगरड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला.

मात्र, या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश आंधळे यांनी मृतदेह नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत सुमारे दोन तासांचा विलंब झाला.

या विलंबामुळे मयताचे नातेवाईक रामदास क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, दशरथ क्षीरसागर तसेच गावचे सरपंच सुनिल अनपट यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. संतप्त ग्रामस्थांनी लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सुविधा नसल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला असून, यापूर्वीही असे प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचा प्रश्न आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.